मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी ‘एक शाम : देश के नाम’मधून विविधतेतून एकतेचा संदेश

‘एक शाम : देश के नाम’मधून विविधतेतून एकतेचा संदेश

 बोईसर : प्रतिनिधी

बोईसर येथील विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक शाम : देश के नाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, पालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखर, पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिलका धिंडा काका यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


कार्यक्रमात ‘भारत एक खोज – भारतभरातील एक सांस्कृतिक यात्रा’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या विविध राज्यांतील संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडविले. काश्मीर, आसाम, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांची वेशभूषा, कला, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून प्रभावीपणे मांडली.


यावेळी प्रेरणादायी कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिलका धिंडा काका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.


कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वाद्यसंगीत, शालेय नेतृत्वाची भाषणे तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर विचार झाले. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताच्या सामूहिक सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


यावेळी प्राचार्य डॉ. देव बसिष्ठा उपाध्याय यांनी शिक्षणाचा उद्देश केवळ शैक्षणिक प्रगतीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, आत्मविश्वास, सहानुभूती, सांस्कृतिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.


२०१३ पासून शैक्षणिक वाटचाल

मॅडम रेणू कोचर यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. जयंत हरि हर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली २०१३ मध्ये विराज इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली. सध्या शाळेत ९०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून IBCP आणि CBSE अभ्यासक्रम राबविले जात आहेत.


शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, कला, नेतृत्वगुण, अनुभवात्मक शिक्षण आणि आधुनिक कौशल्यांच्या विकासावर शाळेकडून भर दिला जात आहे. भारतीय संस्कृती व मूल्यांशी नाते कायम ठेवत जागतिक दृष्टिकोन असलेली युवा पिढी घडविण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.



देशभक्ती आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘एक शाम : देश के नाम’ या उपक्रमातून भारताच्या ‘विविधतेत एकता’ या वैशिष्ट्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने