मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात


 पालघर | प्रतिनिधी

वीज मीटर तपासल्यानंतर जास्तीचे आलेले वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी ग्राहकाकडे ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वायरमनला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. प्रदीप सुभाष महाजन (वय ३८), व्यवसाय वायरमन तथा कनिष्ठ तंत्रज्ञ, एमएसईडीसीएल, रा. उमरोळी, ता. जि. पालघर, असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.


एसीबीकडे एका तक्रारदाराने महाजन याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या घरी वीज मीटरची तपासणी केल्यानंतर जास्तीचे येणारे वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी महाजन याने ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.


या तक्रारीची एसीबीने १९ ऑगस्ट २०२६ रोजी दांडीपाडा, खारेकुरण, पालघर येथे पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन केले.


२० ऑगस्ट रोजी मिठागर रोड, खारेकुरण येथे कायदेशीर सापळा रचण्यात आला. यावेळी प्रदीप महाजन याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.


या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८, सुधारित अधिनियम २०१८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या अटकेबाबतही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने नमूद केले आहे.


ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक दादाराम सुभाष करांडे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, जितेंद्र गवळी, प्रकाश दळवी आणि आकाश लोहार यांचा समावेश होता.


जागरूक आवाज न्यूज — भ्रष्टाचाराविरोधातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष!

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने