रविवारपर्यंत पोलीस कोठडी; या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक
पालघर, दि. ११ : जखमी गोविंदाच्या उपचाराच्या पैशांवरून रिलिफ हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात फरार असलेला शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत याला पालघर पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले.
गोविंद पथकातील या कारवाईदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने रोहित गावीत याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यापासून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगरसेवक नीलम संखे आणि शुभम बांदिवडेकर हे अद्याप फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तपास अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा बदल
या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक विनायक कैसरकर यांच्याकडे तपास होता. त्यानंतर तपास पालघरचे पोलीस उपअधीक्षक उमेश गवळी यांच्याकडे सोपवण्यात आला. आता हा तपास पोलीस उपअधीक्षक निशा जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे..
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मीरा-भाईंदर येथून रोहित गावीतला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत शिंदे गटाचा निलंबित कार्यकर्ता साईराज पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
