चांदीप येथील शांताराम बापूजी जाधव हायस्कूल द्वितीय, तर विक्रमगड हायस्कूल तृतीय
पालघर : शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद पालघर यांच्या अंतर्गत जिल्हा गणित-विज्ञान अध्यापक मंडळ आणि आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म. नि. दांडेकर हायस्कूल, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२६ चे आयोजन गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पालघर येथे करण्यात आले. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या पाच संघांनी सहभाग घेतला.
वसई, पालघर, तलासरी, विक्रमगड आणि जव्हार या पाच तालुक्यांतील विजेत्या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण केले. विज्ञान विषयातील विविध संकल्पना, सामाजिक प्रश्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी नाट्यरूपातून मांडत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील, आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे, स्कूल कमिटी चेअरमन उपेंद्र घरत, मी पालघरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे, उपाध्यक्ष उमेश पाटील, पालघर तालुका अध्यक्ष विनिता घरत, जव्हार अध्यक्ष वाल्मीक डहारे, सदस्य सौ. लोबो तसेच ज्येष्ठ शिक्षक सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण सौ. मधुमती कुलकर्णी, सौ. पूजा पाटील आणि श्रीमती स्मिता माळवदे यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी म. नि. दांडेकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निकालात भगिनी समाज, पालघर याने प्रथम क्रमांक पटकावला. शांताराम बापूजी जाधव हायस्कूल, चांदीप (वसई) यांना द्वितीय, तर विक्रमगड हायस्कूल, विक्रमगड यांना तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकाचा विजेता संघ आता विभागीय स्तरावर पालघर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
विजेत्या संघांना मी पालघरकर प्रतिष्ठानच्या वतीने ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ उपशिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील, शिक्षक नेते पी. टी. पाटील, संतोष पावडे आणि पर्यवेक्षिका सौ. घुगे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता घरत यांनी केले, तर भावेश संखे यांनी आभार मानले.
