मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ*

स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ*


 जिल्हा परिषद पालघर 

दिनांक 17.09.2926




शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’चा जिल्हास्तरीय शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी पालघर तालुक्यातील नंडोर-देपखोप ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर नंडोरे उपकेंद्र येथे ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदाब, मधुमेह तसेच गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी, शिवमंदिर आणि तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले.


‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, यावर्षीची संकल्पना ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ अशी आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.


स्वच्छ भारत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर अभियानातून भर देण्यात येत आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, शासकीय विभाग, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी सांगितले.


यावेळी पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी बापुराव नाळे, तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख, विस्तार अधिकारी राजेश कोळी, सरपंच सोनल घोडके, उपसरपंच सुचिता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी निलेश देवरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील आत्माराम विशे, संजय ठाकरे, रूपाली मोहनकर यांच्यासह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि बचत गट सदस्य उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने