*सेवा संकल्प अभियानाचा प्रचार रथ मार्गस्थ*
पालघर, दि. १७ सप्टेंबर २०२६ : आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि सुविधांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत योजनांची माहिती दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या प्रचार रथाचा शुभारंभ आमदार हरिश्चंद्र भोये हस्ते आणि प्रकल्प अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, विकास, स्वयंरोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रचार रथाच्या माध्यमातून गावागावांत पोहोचविण्यात येणार आहे.
योजनांसाठीची पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांना सुलभ पद्धतीने दिली जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती वेळेत मिळून शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे.
‘माहितीपासून लाभापर्यंत’ हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत असून, शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रचार रथ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या प्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, मच्छिंद्र गडाख, नियोजन अधिकारी सतीश रास्ते, लेखा अधिकारी ज्ञानदेव कचरे, कार्यालय अधीक्षक योगेश भोये, संशोधन सहायक ऋषिकेश डाकोरे यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा सेवा संकल्प अभियानाचा प्रमुख उद्देश असून, या अभियानामुळे आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला अधिक व्यापक स्वरूपात चालना मिळण्यास मदत होणार आहे.
