मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी कृषि दिनानिमित नवली येथे “ बीजगोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कृषि दिनानिमित नवली येथे “ बीजगोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम” उत्साहात संपन्न

 


 



कृषि दिनानिमित आणि  वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत  नियतक्षेत्र संरक्षित वन नवली येथे “ बीज गोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम”  उत्साहात संपन्नझाला. सदर कार्यक्रमात सीड बॉल आणि वृक्ष लागवड करून पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात भर पावसात संपन्न झाला.पर्यावरण संवर्धनाबाबत सीड बँक तयार करणे, सीड बॉल तयार करणे, रोपे लागवड करणे, ग्लोबल वार्मिंग, तापमान वाढ, वाळवंटीकरण इत्यादी गोष्टीबद्दल युवक, विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण कायद्यांविषयी माहिती देणे तसेच वाढत्या पर्यावरणीय समस्यांबाबत समाजात जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


 वन महोत्सव  निमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर आणि नगरपरिषद पालघर यांच्याकडून आयोजित संरक्षित वन नवली येथे “ बीज गोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम”   कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन आणि प्रस्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी पालघर सुशील नांदवटे यांनी केले तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून देताना पर्यावरण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून प्रत्येकाच्या अस्तित्वाशी निगडित घटक असल्याचे सांगण्यात आले. शुद्ध हवा, पाणी, अन्न, आरोग्य आणि सुरक्षित जीवन यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. वाढते तापमान आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम लक्षात घेता ही बाब आता केवळ शास्त्रज्ञांची चिंता राहिलेली नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित झाली आहे, असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक अहवालानुसार पर्यावरणाचे सतत नुकसान होत राहिल्यास जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसने वाढवून समुद्राची पातळी एक मीटरने वाढणार असून समुद्र किनाऱ्यावरील  शहरे पाण्याखाली जाण्याचा शक्यता आहे.



औद्योगिक क्रांतीपूर्वीचा काळ आणि आजची स्थिती यांची तुलना केल्यास पर्यावरणातील बदल स्पष्टपणे दिसून येतो. त्या काळी जंगले विस्तीर्ण होती, नद्या मुक्तपणे वाहत होत्या आणि पावसाचे चक्र नियमित होते. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर कोळसा व खनिज तेल यांसारखी जीवाश्म इंधने मोठ्या प्रमाणावर जाळली जाऊ लागल्याने हरितगृह वायूंचे (ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जन वाढले आणि पृथ्वीचे सरासरी तापमान सातत्याने वाढत गेले. 


ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मानवनिर्मित कारणांमुळे  वृक्षतोड, औद्योगिकीकरण, वाहनांचा धूर, प्लास्टिकचा वापर 

पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता सातत्याने वाढत जाणे, तर या वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून पाऊस, वारे, समुद्रपातळी आणि ऋतुचक्रामध्ये होणाऱ्या दीर्घकालीन बदलांना हवामान बदल (क्लायमेट चेंज) असे संबोधले जाते, ग्लोबल वॉर्मिंग हे हवामान बदलाचे मूळ कारण असून हवामान बदल हा त्याचा व्यापक व दृश्य परिणाम आहे,झपाट्याने होणारा औद्योगिक विकास, वाढते शहरीकरण आणि त्यासाठी होणारी अनिर्बंध वृक्षतोड यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून जमिनीची धूप रोखण्याचे कार्य करतात; मात्र मोठ्या प्रमाणावर जंगले नष्ट झाल्याने डोंगर उतारावरील माती धरून ठेवणारी मुळेच नाहीशी होतात आणि पावसाच्या पाण्यासोबत सुपीक माती वाहून जाते. याचे ठळक उदाहरण म्हणजे पंजाबमधील प्रसिद्ध भाक्रा नांगल धरण. हे धरण उभारले गेले तेव्हा त्याचे अपेक्षित आयुष्य सुमारे ९७ वर्षे इतके गृहीत धरण्यात आले होते. परंतु आजूबाजूच्या डोंगरांवरील जंगले नष्ट झाल्याने पावसासोबत मोठ्या प्रमाणात गाळ धरणात साचत गेला आणि साठवण क्षमता घटत गेल्याने धरणाचे प्रत्यक्ष उपयुक्त आयुष्य निम्म्याहून कमी झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. वृक्षतोडीचा परिणाम थेट धरणांच्या आयुष्यावर व पाणीपुरवठ्यावर कसा होतो, याचे हे बोलके उदाहरण आहे.



जंगलतोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगाने वाहून जाते, परिणामी भूजल पातळी (ग्राऊंड वॉटर टेबल) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडत असून अनेक गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जंगल ही निसर्गाची नैसर्गिक 'जलसंचय यंत्रणा' असून ती नष्ट झाल्यास पाणीटंचाई अटळ ठरते, हेच या समस्येचे मूळ कारण असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.



यावेळी श्री. सचिन राठोड यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांतील प्रमुख वैशिष्ट्ये तसेच त्यांचे पर्यावरणीय महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 


वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पालघर श्री. सुशील नांदवटे यांनी सांगितले की, हवामान बदल ही केवळ शासकीय यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण जितकी अधिक वृक्षलागवड करू आणि जंगलांचे संरक्षण करू, तितकाच पाऊस नियमित राहील, भूजल पातळी टिकून राहील आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल.वनविभाग नेहमी निसर्ग संवर्धन आणि संरक्षण याबाबत जनजागृती व विविध स्पर्धेचे यापुढे देखील आयोजन करेल तसेच यावर्षी एक कोटी वृक्ष लागवड पालघर जिल्ह्यात करावयाची असल्याने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.



कृषि दिनानिमित  पालघर वनपरिक्षेत्र कार्यालय,पालघर,नगर परिषद पालघर तसेच   सेंट जॉन महाविद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून  नवली नियतक्षेत्र येथील संरक्षित वन क्षेत्रातील मोकळ्या जागेत 80 ते 85 विद्यार्थी ,तरुण ,गावकरी वन कर्मचारी ,नगर परिषद कर्मचारी  यांनी  सुमारे25000  बीज गोळ्यांचे (Seed Balls) फेकून वृक्ष लागवड करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीज गोळे पावसाळ्यात उगवून त्यापैकी सुमारे 65  ते 70 टक्के बीजांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याने हा उपक्रम वनसंवर्धनासाठी प्रभावी ठरणार आहे.तसेच जंगली प्रजातीची 100   वृक्ष लागवड यावेळी करण्यात आली. 



याच अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक पालघर श्री. सुशील गंगाधर नांदवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सुमारे १ लाख बीज गोळ्यांची निर्मिती करण्यात आली असून लोकसहभागातून विविध वनक्षेत्रांमध्ये बीज गोळ्यांचे प्रक्षेपण करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कमी खर्चात, स्थानिक प्रजातींच्या संवर्धनाला चालना देत अधिकाधिक क्षेत्र हरित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.


सदर दोन्ही कार्यक्रमास डहाणू वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. निरंजन दिवाकर, सहाय्यक वनसंरक्षक श्री. रामानुजी बांगर यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरिता कराड वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रमुख पाहुणे प्रीती मोरे नगरसेविकानगर परिषद पालघर मधील अश्विनी माछी स्वच्छता निरीक्षक, भूषण काबाडी, किरण सावर, श्रुती मोहिते, विकास मोरे प्राध्यापक शुभम नांदले,प्राध्यापक स्वाती बावनकर प्राध्यापक आसमा शेख  तसेच   सेंट जॉन महाविद्यालय अध्यक्ष प्राचार्य यांचे देखील सहकार्य् लाभले .  वनअधिकारी सुशील विसपुते , प्रदीप सुतार, सुनील घुटे,, गणेश रावते ,निकिता गवळी, वृषाली वरठा, सोनाली झूगरे, प्रदीप कांबडी , प्रमोद घेगड, उत्तम कांबळे,दिनेश गिरणे ,अविनाश ,श्रुतीक जाधव ,जयवंत पाटील ,भारती चव्हाण सर्प इंडिया संस्थेचे सदस्य सचिन  राठोड जय दोडी ,अरविण खरवडे अक्षय मांडल,रोहित  पडीयाळ,जय  धोडी,राहुल भुतकडे,अरविंद खरपडे,रोहित  दांडेकर ,नितेश  वारथा,तसेच महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



“पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने नागरिकाने  दर वर्षी  किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होईल."-श्री. सुशील नांदवटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), पालघर

 


प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा पर्यावरण रक्षक आहे. त्यामुळे युवकांनी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. आपण लावलेला प्रत्येक वृक्ष हा भावी पिढ्यांसाठी दिलेला अमूल्य वारसा आहे.-श्री. निरंजन दिवाकर,उपवनसंरक्षक  डहाणू 


“पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने नागरिकाने  दर वर्षी  किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होईल."-सुशील नांदवटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), पालघर

 


शाश्वत विकासाची सुरुवात एका वृक्षापासून होते. प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर हरित भविष्यासाठी भक्कम पाया रचला जाईल." - श्री. रामानुजी बांगर सहाय्यक वनसंरक्षक

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने