पालघर | प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
विक्रमगड तालुक्यात उटावली, सुखसाळे सुरू पाडा आणि दादडे येथे घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. देहरजे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने शीळ–देहरजे मार्ग बंद करण्यात आला असून विक्रमगडमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मनोर–भोपोली पुलावरूनही पाणी वाहत आहे.
वसई तालुक्यात वसई, विरार आणि नालासोपारा येथे अनेक भागांत पाणी साचले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. नवघर एसटी स्थानकातील फलाट क्रमांक ३ वरील शेडवर मोठे झाड कोसळून नुकसान झाले आहे.
पालघर तालुक्यात मनोर–वाघोबा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ढेकळे फन हॉटेल व वेगास हॉटेलसमोरील राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. केळवा रोड–खांबखाडी, सफाळे–तांदूळवाडी, जव्हार फाटा, जलसार–टेंभी–खोडावे, गोवाडे–रायपाडा, एडवण–डोंगरे–खार्डी–दातीवरे तसेच कोळगाव पुलावरील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आल्याळी नवापाडा, खामलोली, बरहाणपूर आणि नंडोरे नाका परिसरात घरांमध्ये पाणी शिरणे व भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या असून आर्थिक नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून मदतकार्य सुरू आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
