*केळवा धरण १०० टक्के भरले २.९५१ क्युसेक्स विसर्ग सुरू*,
*जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावी*
*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे आवाहन*
*धरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त मोहीम*
पालघर, ६जुलै २०२६ :पालघर तालुक्यातील महिम-केळवा लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेले केळवा धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून २.९५१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे .जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले
पश्चिम रेल्वेच्या मुंबई–सुरत मार्गावरील केळवारोड स्थानकाजवळील झांगरोली गावाशेजारील स्थानिक नाल्यावर उभारण्यात आलेले हे धरण सन १९८१ मध्ये पूर्ण झाले असून, गेली ४५ वर्षे परिसराला सिंचनाचा लाभ देत आहे.
सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी ३.२४२ दलघमी इतकी असून धरण १०० टक्के भरले आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे नियमानुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन धरणाखालच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तहसीलदार पालघर यांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच जलसंपदा विभागाची यंत्रणा , पोलिस घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पोलीस अधिक्षक यतीश देशमुख,सातत्याने लक्ष ठेवत आहेत.
पुढील गावांनी सतर्क रहावे
दसमाळा, भुतान माळ, झांझरोळी, भरणपाडा, टोकराळे, देवीपाडा, देवशेत पाडा, मायखोप, पाटीलपाडा, पळगेपाडा, तरडेपाडा, बेंदळी, राठे, रवलपाडा आणि माकुणसार या आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे,
अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जलसंपदा विभाग आणि महसूल, पोलीस प्रशासन संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत असून, सद्यस्थितीत धरण परिसरातील नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र नदी-नाले, धरणाचा सांडवा आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले .अपडेट : केळवा धरण परिस्थिती
तात्पुरत्या तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत धरण परिसरात धूप रोखण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी गोण्या व दगडांच्या साहाय्याने मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनामार्फत पाण्याचा प्रवाह आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास अतिरिक्त विशेष सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था तात्काळ करण्यात येणार आहेत.
प्रभावित क्षेत्रातील ओळख करण्यात आलेल्या आठ गावांपैकी चार गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये सुमारे १३० कुटुंबे असून त्यापैकी ६५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, तर उर्वरित ६५ कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीआरएफची टीम परिसरात तैनात करण्यात आली असून स्थलांतर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संयुक्तपणे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
