पालघर, दि. १७ जुलै : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या चार स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ₹३८,५३,६६६ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने केली. गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक उघडकीस आणण्यात आली.
कारवाईदरम्यान विविध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. या चारही गुन्ह्यांमध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित वाहनांसह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. पालघर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
