पालघर, दि. २९ जुलै : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ₹४७,९३,०९६ किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व आयशर टेम्पो जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून MH-04/LY-5891 क्रमांकाचा आयशर टेम्पो अडविला. तपासणीदरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत प्रतिबंधित पान मसाल्यासह सुमारे ₹२० लाखांचा आयशर टेम्पो असा एकूण ₹४७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संजयकुमार रजवंत केवट (रा. भिवंडी) आणि मोहम्मद इशराक अहमद अन्सारी (मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
