अकोट | प्रतिनिधी :
अकोट शहरात अवैध गुटखा तस्करीविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी IPS निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई करत गुटख्याने भरलेले एक पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला असून एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात सापळा रचून ही कारवाई केली. तपासणीदरम्यान पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमालासह वाहन जप्त केले असून ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे.
अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
