सातपाटी : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्रमजीवी संघटना, तालुका पालघर यांच्या वतीने सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी श्रमजीवी संघटनेच्या महिला सभासद तसेच श्रमजीवी विद्यार्थी संघटनेच्या युवतींनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संघटनेचे तालुका सचिव शंकर वरखंडे, गटप्रमुख रोशन धांगडे, निशिकांत तरे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सण-उत्सवाच्या काळातही पोलिस कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर तैनात असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. हीच भावना लक्षात घेऊन श्रमजीवी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस बांधवांना राखी बांधत बंधुभावाचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
