पालघर : पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या आयोजनातून जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा पालघर येथील म. नि. दांडेकर हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : संधी व आव्हाने’ या विषयावर राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या निर्देशानुसार हा मेळावा आयोजित करण्यात
आला.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विजयी ठरलेले दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक वेतन पथक, पालघरचे चतुर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा गणित-विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणीने विशेष योगदान दिले. परीक्षक म्हणून प्रा. संजय घरत, डॉ. राजमहेंद्र पाटील व विज्ञान मार्गदर्शक उमेश पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेत उत्कर्ष विद्यालय, वसईच्या कु. कृपा नामदेव आडकुरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. सेंट जॉन, पालघरच्या कु. ग्रेस मॅरियन सॅम हिने द्वितीय, तर एम. बी. बी. आय., तलासरीच्या कु. अंश अजयप्रताप यादव याने तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी विभागस्तरावर पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पारितोषिक वितरण समारंभास आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे, मी पालघरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी प्रशांत पाटील यांच्या वतीने देण्यात आल्या. शाळेच्या वतीने अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास जाधव यांनी केले. मुख्याध्यापिका विभूती चौधरी, कैलास जाधव, विनिता घरत, संस्कृती मराठे, प्राजक्त सुतार, अजित दळवी तसेच आर्यन हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
