पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; हक्क-अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन
पुणे : “भटके विमुक्त समाजाने देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये आपल्या मतांची ताकद दाखवली पाहिजे. तरच समाजाला आपले हक्क, अधिकार मिळतील आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने साने गुरुजी सभागृहात आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी ॲड. आंबेडकर यांनी भटके विमुक्त समाजाला निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व पटवून देताना, “मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही,” असा निर्धार गावागावात करण्याचे आवाहन केले. कष्टाच्या जोरावर जगणाऱ्या समाजाने स्वाभिमानाने जगावे आणि कोणाचीही गुलामगिरी अथवा लाचारी स्वीकारू नये, असेही त्यांनी सांगितले.
1990 मध्ये काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण करून देताना ॲड. आंबेडकर यांनी हॅबिट्युअल ऑफेंडर्स कायद्याच्या विरोधातील लढ्याचा संदर्भ दिला. न्यायालय एखादा कायदा रद्द करू शकते; मात्र नवीन कायदे करण्यासाठी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा या लोकशाहीच्या सभागृहांमध्ये आपले प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी भटके विमुक्त समाजाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मागील महिन्यात राज्यभर ‘मुसाफिर यात्रा’ काढून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये समाजाने सहभागी होऊन नेतृत्व निर्माण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
परिषदेत विजय जाधव, डॉ. कैलास कदम, ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, अंबरसिंग चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ॲड. डॉ. अरुण जाधव लिखित ‘भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून परिषदेचे उद्घाटन झाले. शाहीर सचिन माळी, शीतल साठे व सहकाऱ्यांनी आंबेडकरी नवयान जलसा सादर केला.
परिषदेपूर्वी सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून पारंपरिक वेशभूषा, वाद्ये, नृत्य आणि संगीतासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंदीवाले, वासुदेव, पिंगळा जोशी, मरीआईवाले, गोंधळी, उंटवाले, रायरंद, बहुरूपी, गोसावी, चित्रकथी, डोंबारी, कोल्हाटी, नाथपंथी डवरी गोसावी आदी विविध समाजघटकांतील पारंपरिक लोककलावंत व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक व कार्यकर्त्यां
नी परिश्रम घेतले.
