*
पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भटके व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आणि समन्वय करण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पालघर यांच्या वतीने सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सहाय्यक संचालकांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच वनार्टी, महाज्योती, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर महामंडळांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, आर्थिक व विकासात्मक संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर आणि दुर्गेश चव्हाण यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील युवकांनी शिक्षण, कौशल्यविकास आणि उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करून प्रगतीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर यांनी केले.
कार्यक्रमास सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे तसेच पालघरचे तहसीलदार तुषार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भटके व विमुक्त समाजासमोरील विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नेणे आणि सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करणे, यावर भर देण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
‘भटके विमुक्त दिवस’ निमित्त पालघर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन शुभांगी लोणकर, सहाय्यक संचालक शुभांगी लोणकर आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तुषार डामसे यांच्या सहकार्याने करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी शासनाच्या योजना आणि समाजातील घटक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
