मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता फिरती आरोग्यसेवा*

पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता फिरती आरोग्यसेवा*

 जिल्हा परिषद पालघर 

दिनांक 01.09.2026


*


*


*लुपिन फाउंडेशनकडून चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन; ६ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार आरोग्यसेवेचा लाभ*



आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणेही अनेकदा आव्हानात्मक ठरणाऱ्या पालघर आणि डहाणू तालुक्यांतील दुर्गम भागातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा थेट त्यांच्या परिसरात पोहोचणार आहे. लुपिन लिमिटेडच्या CSR शाखा लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने पालघर जिल्ह्याला चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन उपलब्ध करून दिली असून, या माध्यमातून दोन्ही तालुक्यांतील ६ लाखांहून अधिक नागरिकांना प्राथमिक तपासणी, आजारांचे लवकर निदान, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचारांची सुविधा मिळणार आहे.


या मोबाइल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, लुपिन फाउंडेशनच्या CSR प्रमुख तुषारा शंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि लुपिनचे तारापूर येथील जनरल मॅनेजर राजेंद्र फिरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सात रोगतज्ज्ञ डॉ. अजय ठाकरे आणि तलासरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.


LIVeS कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेली ही पालघर जिल्ह्यातील चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन आहे. यापूर्वीच्या तीन व्हॅनच्या माध्यमातून पालघर-डहाणू, विक्रमगड-तलासरी आणि जव्हार-वाडा या तालुक्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जात आहे. नव्या व्हॅनमुळे विशेषतः आरोग्य सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या गावांमधील नागरिकांना तपासणी आणि उपचारासाठी दूरच्या आरोग्य केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार आहे.


मोबाइल मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, दीर्घकालीन अडथळा आणणारे फुफ्फुसांचे आजार (COPD) तसेच इतर असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान आणि व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. नियमित तपासणीद्वारे आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे, वैद्यकीय सल्ला व आवश्यक उपचार देणे आणि गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करणे, अशी या सेवेची कार्यपद्धती असणार आहे.


दरम्यान, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये राबविण्यात येत असलेल्या LIVeS कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ६७३ गावांमधील २ लाख ९७ हजार २८२ हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कार्यक्रमांतर्गत १,२०० हून अधिक मोफत वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली असून, १ लाख ३ हजार ९८४ हून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा आणि CSRच्या सहकार्याने सुरू झालेली ही सुविधा ग्रामीण नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.


यावेळी नचिकेत सुळे, आनंद दळवी, अक्षय कुलकर्णी, अभिषेक कुमार, नाजीम पठाण, कृष्णा बाजारे, डहाणू व तलासरी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच लुपिन फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने